किशोरवयीन मुलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी टिप्स..


काही दिवसांपूर्वी एका पालकांचा फोन आला होता, त्यांचं म्हणणं होतं १५ वर्षांचा त्यांचा मुलगा हल्ली खूप विचित्र वागतोय, अभ्यास करत नाही, नीट जेवत नाही, झोपत नाही, मित्रांसोबत खेळायला बाहेर जात नाही, शाळेत जायचं म्हंटल की याचं काही ना काही दुखायला लागतं, काही बोलायला, विचारायला गेलं की चिडचिड करतो. त्या मूलाशी बोलताना जाणवलं की अभ्यासाचा त्याला थोडा जास्त ताण आलाय. परीक्षेत कमी मार्क्स मिळाल्यामुळे तो मानसिकदृष्ट्या खचत चालला होता.

         नमस्कार, मी उचिता थोरवत. विद्यार्थी-पालक समुपदेशक, युवा यश मार्गदर्शक आणि युवा स्पंदन या प्लॅटफॉर्म ची निर्माती. येत्या तीन वर्षांत महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील १०००० किशोरवयीन मुलांना शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा माझा ध्यास आहे. 

           मानसिक ताण किंवा चिंता ही अशी गोष्ट आहे जी माणसाला कोणत्याही वयात त्रास देऊ शकते. मानसिक आरोग्याचा विचार करून पुढे जाणे खूप गरजेचे असते आणि अशा वेळी व्यक्तीला प्रियजनांची गरज भासते.  सर्वात मोठी समस्या म्हणजे किशोरवयीन वय, ज्याला सर्वात नाजूक वय म्हंटल जातं, या वयात मानसिक तणावाचा धोका अधिक असतो. कोविड-19 मुळे ही समस्या आणखीन वाढली आहे. या वातावरणात प्रत्येक वयोगटातील लोकांसोबत मानसिक तणावासारखी परिस्थिती निर्माण होत असून किशोरवयीन मुलांची समस्या आणखी वाढली आहे.  किशोरवयीन आणि कुमारवयीन मुले आपल्या लोकसंख्येच्या 21% आहेत आणि आकडेवारी सांगते की जागतिक लोकसंख्येतील मानसिक आरोग्य समस्यांपैकी 16% समस्या या या वयोगटाच्या आहेत.  भारतात हा आकडा 6-12% आहे.

 सुमारे 50% किशोरांना वयाच्या 14 व्या वर्षीच कोणत्या ना कोणत्या प्रकारचे मानसिक आजार होतात.  यानंतर, सर्वात त्रासदायक परिस्थिती वयाच्या 24 व्या वर्षापासून सुरू होते. या समस्येबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी, मी डॉ. हिमानी नरुला यांना फॉलो केलं. त्यांनी लिहिलेल्या लेखांमुळे मुलांच्या मानसिक आरोग्याविषयी बरेच काही समजले त्यामुळे किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी कोणती काळजी घेतली पाहिजे हे देखील समजले.


 या कारणांमुळे किशोरवयीन मुलांचा मानसिक ताण वाढू शकतो-

 डॉ. हिमानी यांच्या मते, रिस्क फैक्टर  अनेक प्रकारचे असू शकतात, जसे की; कौटुंबिक कारणे एखाद्या घरात नैराश्य, आत्महत्या यांसारख्या घटना पूर्वी घडल्या असतील तर,  मनोवैज्ञानिक घटक जसे की, आवेगात येऊन घेतलेला निर्णय किंवा जोखीम, किशोरवयीन मुलांना अशी जोखीम घ्यायला आवडत असतं. प्रत्येक काम परफेक्ट करण्याची इच्छा, कमी आत्मसन्मान, अपराधीपणाची भावना आणि बालपणातील अत्याचार, जसे की शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार इ. किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक रोगाची कारणे बनू शकतात.


          या व्यतिरिक्त, मुलांवर सामाजिक वर्तनाचा ही खूप परिणाम होतो जसे की, कौटुंबिक कलह, अभ्यासातील खराब कामगिरी, पालकांपैकी एकाची अनुपस्थिती, मुलांकडे पालकांचे लक्ष नसणे, शालेय जीवनातील एखादी समस्या, आर्थिक समस्या इत्यादी सर्व काही कारण असू शकते. यामुळे किशोरवयीन मुलांच्या मनावर खोल परिणाम होऊ शकतो.

          कोविड परिस्थिती मध्ये ही परिस्थिती अधिक चिंताजनक बनली होती. केवळ आर्थिक समस्याच नाही तर सोशल आइसोलेशल आणि परिवारातील इतर मंडळी, मित्रपरिवार यांच्याशी संपर्क कमी झाल्यामुळे ती ही ल एक वेदना बनली होती,   शारीरिक हालचाली देखील कमी झाल्या होत्या आणि यामुळे धोका वाढत होता.  त्यामुळे मुलांची दिनचर्या बिघडली होती, स्क्रीन टाइम वाढला होता, शाळा बंद पडल्या होत्या, कौटुंबिक कलहही वाढला होता, हे सगळं आता संपलेलं असलं तरी मुलांच्या मनावर त्याचे खोलवर पडसाद उमटले आहेत, आजही मुलांना त्याचा त्रास होत आहे.


★ मुलांच्या कोणत्या गोष्टी सांगतील की त्याला मानसिक समस्या आहे?-

जर तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे तुमच्या मुलांमध्ये दिसत असतील, तर असे मानले जाऊ शकते की तुमच्या मुलाला मानसिक समस्या आहे आणि त्यासाठी एखाद्या समुपदेशकाची ची गरज आहे.

१.  झोपायच्या आणि उठायच्या वेळेत आणि कालावधीत अचानक बदल.

२. अचानक अभ्यास करणे सोडणे अथवा शाळेतच न जाणे.

 ३. कोणत्याही प्रकारच्या सामाजिक कार्यात सहभाग न घेणे आणि अगोदर ज्या गोष्टी आवडायच्या त्यांपासून दूर पळणे.

 ४. कोणत्याही प्रकारची खूपजोखीम असलेले वर्तन करणे, जसे की ड्रग्ज चे सेवन करणे, रागाच्या समस्या किंवा दुसर्‍याला त्रास देणे.

 ५. मित्रांशी संवाद साधण्यात अडचण - इतर मुलांमध्ये रस न दाखवणे, मित्र बनवता न येणे, सामाजिक अडचणी, एकटेपणा वाटणे.

 ६. कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष न केंद्रित करू शकणे आणि दीर्घ काळासाठी कामे अपूर्ण ठेवणे.

 ७. ऍक्टिव्हिटी पातळीत अचानक बदल - एकतर खूप सुस्त होणे किंवा खूप सक्रिय होणे.  एका जागी न बसू शकणे. कोणत्याही गोष्टीची वाट न पाहू शकणे.

 ८. लेखन, वाचन, गणित इ. काहीही न करू शकल्यामुळे खूप अस्वस्थ होणे यासारख्या अभ्यासाशी संबंधित समस्या.

 ९. आत्मसन्मान कमी असणे, कोणतेही काम करण्यास खूप घाबरणे, आत्मविश्वास नसणे आणि स्वतःला कमी लेखणे.

 १०. निराशा, चिडचिड, भावनिक समस्या यासारख्या भावनात्मक समस्यांसह वारंवार मूड बदलणे.

 ११. मनोरंजक गोष्टींकडे लक्ष न देणे - एकटेपणा जाणवणे, खूप वेळ एकटे बसणे आणि थकणे, मुले करत असलेल्या ऍक्टिव्हिटी लक्ष न देणे, स्वतःला इतरांपेक्षा वेगळं समजणे.

१२. कमीपणाची आणि अपराधीपणाची भावना तसेच स्वतःला चुकीचे समजणे.

१३. कोणत्याही प्रकारच्या आत्महत्या समस्या, hopeless होणे.

 १४. सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता करणे आणि खूप अस्वस्थ होणे आणि ही समस्या अनेक महिने कायम राहते.

 १५. सामाजिक उपक्रमांची भीती.

१६.  इतर लोक मला चुकीचे समजतील असा विचार असा वारंवार विचार करणे. 


                जर या सर्व गोष्टी तुमच्या मुलांसोबत सतत घडत असतील तर तुम्ही सतर्क झाले पाहिजे, तुमच्या मुलाच्या मूड स्विंग्स सामान्य नसून ही एक अतिशय गंभीर समस्या आहे. या नाजूक वयात आपण त्यांना मदत केली पाहिजे.

जर तुमचे मूल मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असेल आणि व्यक्तिमत्व आणि मनःस्थितीशी संबंधित लक्षणे दिसत असतील तर त्याला बाल मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट किंवा मानसिक आरोग्य समुपदेशकाकडे घेऊन जा.  ते एक्सपर्ट असतात जे डॉक्टरांप्रमाणेच तुमच्या मुलाची समस्या समजू शकतात आणि त्यांच्या अडचणी कमी करण्यास मदत करू शकतात.  तुमच्या मुलाला भरपूर प्रेम द्या आणि त्याला खात्री द्या की तो लवकरच बरा होईल. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा अवास्तव दबाव आणू नका. त्याच्याशी सतत बोलत राहा जेणेकरून त्याच्या मनात काही गोंधळ असेल तर तो तुम्हाला उघडपणे सांगू शकेल.

       मित्रांनो, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like व  comment जरूर करा आणि share करायला ही विसरू नका. तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं  आयुष्य ही बदलू शकतं. 

         तुमचे काही प्रश्न असतील तर ते ही तुम्हीं मला विचारू शकता. किशोरवयीन मुलांचं समुपदेशन करायचं असल्यास माझ्याशी संपर्क साधू शक्यता. किशोरवयीन मुलांबाबत अजून मार्गदर्शनासाठी आजच माझी युवा स्पंदन ही कम्युनिटी जॉईन करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या