किशोरवयातील बंडखोर मुलांना हाताळण्यासाठी जबरदस्त ३ टिप्स. Awesome 3 tips for handling teens with rebellious children.



प्रत्येक पालकाच्या आयुष्यात आपल्या मुलाच्या संगोपनात कोणतीही कमतरता राहू नये हे ध्येय असते. पालक झाल्यानंतर बहुतेक जोडपी त्यांचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या मुलाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांमध्ये घालवतात. भविष्यात मुलाचे वर्तन कसे असेल यामध्ये संगोपनाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मुलांच्या वयात एक महत्वपूर्ण टप्पा येतो ज्याला आपण किशोरवय म्हणतो आणि किशोरवयीन मुलांना हाताळणे हे एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाही.  या वयात मुलं स्वत:ला प्रौढ समजायला लागलेले असतात आणि यामुळे कोणत्याही प्रकारची बंधने किंवा नियम त्यांना नको असतात, अशावेळी आपण जर त्यांना काही सांगायला गेलो तर ते बंडखोर असल्यासारखे वागायला लागतात.

नमस्कार, मी उचिता थोरवत. विद्यार्थी-पालक समुपदेशक, युवा यश मार्गदर्शक आणि युवा स्पंदन या प्लॅटफॉर्म ची निर्माती. येत्या तीन वर्षांत १०००० किशोरवयीन मुलांना शारीरिक, मानसिक, भावनिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनवणं हा माझा ध्यास आहे. 

            पालकांचा त्यांच्या  मुलांवर हक्क असतोच, पण या मुळे पालक मुलांना सतत प्रत्येक गोष्ट समजावून सांगत राहतात, परंतु यामुळे काही मुलांच्या मनात नकारात्मकता निर्माण होऊ लागते. पालक चांगल्या संगोपनाच्या नादात त्यांना सतत शिकवण आणि सल्ले देत राहतात, परंतु या गोष्टी मुलाच्या चिडचिडेपणाचे कारण बनू शकतात.  कधी कधी मुलं घरात बंडखोर असल्यासारखी वागू लागतात. या लेखात मी तुम्हाला काही युक्त्या सांगू इच्छिते ज्या तुम्हाला तुमच्या बंडखोर मुलांना हाताळण्यास मदत करू शकतील.


 १. प्रत्येक परिस्थितीत शांत रहा:

 पौगंडावस्थेत मुले स्वत:ला स्मार्ट समजू लागतात आणि त्यांना पालकांनी दिलेले ज्ञान जुन्या पद्धतीचे आहे असे वाटत असते.  अनेक वेळा आई-वडील आणि मुलांचा अहंकार मध्ये येऊ लागतो आणि ते भांडण किंवा नकारात्मकतेचे कारण बनू लागते. या परिस्थितीत, आपण समजदार व्यक्तीसारखे वागले पाहिजे. शांत राहून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण बरेचदा मुलांच्या एखाद्या कृतीमुळे मुलांसोबत पालक स्वतः लहान असल्यासारखे भांडायला लागतात. अशावेळी शांत राहून योग्य उपाय शोधायला हवा.


२. नियम बनवा:

असेही होऊ शकते की, तुमचे मूल स्वतःला स्मार्ट समजून तुमच्याकडे किंवा तुम्ही सांगितलेल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू लागले. परंतु मुलांवर सक्ती चांगले नाही, पण म्हणून त्याला पूर्णपणे सूट देणे हे देखील चांगले नाही. म्हणूनच घरातील वातावरणाचा समतोल राखण्यासाठी काही नियम तयार करा.  मुलाला नियम सांगण्याबरोबरच ते बनवण्याचे कारणही सांगा.  त्या नियमांचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे त्याला सांगा.  यामुळे मुलांनाही त्यांना कधी, कुठे आणि कसे वागावे हे समजू शकेल आणि हो, सगळ्यात महत्वाचे हे नियम सगळ्यांसाठीच असतील. तुम्हालाही ते पाळावे लागतील. कारण मुलं आपण काय सांगतो त्यापेक्षा आपण काय करतो, यावर लक्ष देत असतात व त्यानुसार वागत असतात.

उदा. जर तुम्हीं रात्री १० वाजता झोपायचं हा नियम बनवला असेल व तुम्हीं स्वतः रात्री १२ वाजले तरी मोबाईल घेऊन बसत असाल तर मुलं तुमचं का ऐकतील. यावर नक्की विचार करा.


 ३. स्वतःचे समुपदेशन:

 किशोरवयात मुलांच्या वर्तवणुकीमुळे पालक त्यांना समुपदेशनासाठी घेवून जातात. परंतु; तुम्हाला देखील समुपदेशनाची आवश्यकता असू शकते. प्रत्येक वेळी, कोणत्याही परिस्थितीसाठी मुलांना जबाबदार धरणे चुकीचे ठरू शकते. अशा परिस्थितीत आपण परिपक्वपणे वागणे आवश्यक आहे. तुम्हालाही राग येण्याची कारणे शोधा. बरेचदा पालक मला कॉल करतात, मुलांबाबतच्या तक्रारींचा मोठ्ठा पाढा वाचतात. सर्व ऐकत असताना मुलांपेक्षा पालकांनाच समुपदेशनाची आवश्यकता आहे, हे प्रकर्षाने जाणवतं.

            आपणही किशोरवयातून गेलोय, आपणही चुका केल्यात, आपणही बंडखोरी केलीय. पालक झाल्यावर मात्र आपण हे सोयीस्कररित्या विसरून जातो. पण तसं न करता आपल्या किशोरवयात आपण डोकावून पाहिलं पाहिजे आणि मग मुलांना समजावून सांगितलं पाहिजे. मुलांसोबत आपल्यालाही संधी मिळते किशोरवय पुन्हा एकदा जगायची. आपणही ते एन्जॉय करायला हवं.

              या ब्लॉग मध्ये आपण शिकलो की मुलांच्या भल्यासाठी आपण मुलांना सतत काही ना काही सूचना देत राहतो, सल्ले देत राहतो, परिणाम मुलं बंडखोर बनतात. याउलट प्रत्येक परिस्थितीत शांत राहून आपण परिस्थिती हाताळू शकतो. तसेच काही नियम बनवून जर ते सर्वांनीच पाळले तरी बरेचसे वाद टाळता येतात. काही वेळा मुलांना जशी समुपदेशनाची गरज असते तशीच पालकांना देखील असते, हे पालकांनी लक्षात घेतलं पाहिजे.

         मित्रांनो, तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला? हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर like व  comment जरूर करा आणि share करायला ही विसरू नका. तुमच्या एका शेअरिंग ने एखाद्याचं  आयुष्य ही बदलू शकतं.  


उचिता थोरवत

समुपदेशक- (मनसंवाद)

टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Thank you for comments